नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात १६ आणि १७ डिसेंबर रोजी ‘श्रीरामछंद’ हे आगळेवेगळे नाणे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे सकाळी १० ते रात्री ८ या काळात आयोजित या मोफत प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन नाण्यांवर प्रभू रामचंद्रांचा उल्लेख पाहायला मिळेल.
प्राचीन नाणी संग्राहक आणि अभ्यासक चेतन राजापूरकर यांनी या प्राचीन नाण्यांचा संग्रह केला असून हे अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आहे. काही वर्षांपूर्वी काही लोकांनी रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. त्यामुळे रामायण घडले होते की नाही याची पडताळणी तत्कालीन राजांनी काढलेली नाणी तसेच शिलालेख यांतून करण्याचा निर्धार राजापूरकर यांनी व्यक्त केला. त्यातूनच त्यांनी श्रीरामांचे चित्र असलेली नाणी जमा केली.
संग्रहातील सर्वात जुने नाणे कोसल जनपदातील:
राजापूरकर यांच्या संग्रहात प्राचीन आणि अर्वाचीन काळातील नाणी असून त्यावर श्रीरामांचे चित्र कोरलेले आहे. यातील सर्वांत जुने नाणे २६०० वर्षे जुने असून, ते कोसल जनपदाचे आहे. यासह सातवाहन, कुषाण, गुप्त, चालुक्य, यादव या घराण्यांच्या आणि विजयनगरसह मुघल साम्राज्यातील नाण्यांवर, नाशिकच्या पहिल्या शतकातील पांडवलेणी क्रमांक ३ वरील ब्राह्मी शिलालेखात, ११ व्या शतकातील अंजनेरीतील शिलालेखात तसेच पोस्टाची तिकिटे, पाकिटांवर तसेच देश-विदेशातील नाण्यांवरही श्रीरामांचे चित्र आहे.
शनिवारी सकाळी १० वा. उदघाटन:
प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राचीन श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य गॅझेटिअरचे संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, गुरुजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल आणि ते सर्वांसाठी खुले आहे.