नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका पाठोपाठ सिडकोत अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीतून सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांची ७१.५ ग्रॅम इतकी एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे. संशयित रोहित नंदकुमार पवार ऊर्फ बिट्टया (वय: २८, रा. चेतनानगर), बाबू प्यारेलाल कनोजिया (वय: ३५, रा. त्रिमूर्ती चौक) अशी दोघा संशयित सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
नाशिक शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांचे पथक कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईनाका भागात या पथकाने एका हॉटेलवर छापा टाकून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली होती.
त्यांच्याकडून देखील सुमारे चार लाख रुपयांची ७८ग्रॅम इतकी एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली होती. यामध्ये एक महिला सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने पाटीलनगर भागातील मनपाच्या उद्यानात सापळा रचला. या ठिकाणी बिट्टया व कनोजिया हे दोघे एमडी ड्रग्ज पावडर विक्रीच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी सुनावली.
बिट्ट्यावर चार गुन्हे:
बिट्ट्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य दोन गंभीर गुन्हे व गंगापूर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच कनोजिया याच्याविरुद्धदेखील अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे पोलीस हवालदार गणेश कोंडे, किसन पवार, नाना बर्डे यांनी केली आहे.