नाशिक (प्रतिनिधी): पळसे येथील देशी दारूचे दुकान फोडून चोरी करणारे तिघे जण अट्टल दुचाकीचोर निघाले आहेत. त्यांना नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका कारसह सात दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या चोरट्यांनी संगमनेर येथेही दारूचे दुकान फोडले होते. तसेच दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली, अशी माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
मागीलवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री चोरट्यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे येथील उत्तम चंद्रमोरे यांचे देशी दारूचे दुकान फोडून एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लांबविला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. हवालदार विजय टेमगर यांनी शिंदे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासल्यानंतर देशी दारूचे दुकान फोडून चोरी करण्यासाठी वापरलेल्या कारसह (एमएच०६ एएन ६९०४) संशयितांची गोपनीय माहिती मिळविली.
पवार यांच्यासह अविनाश देवरे, संदीप पवार, विशाल कुंवर, अजय देशमुख, समाधान वाजे, नाना पानसरे, रोहित शिंदे यांच्या पथकाने संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वंजारगाव गाठले. तेथे सापळा रचून संशयित रजनीकांत त्रिभुवन घेतले. याला ताब्यात पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांसोबत विविध ठिकाणी दुचाकी व दोन ठिकाणी देशी दारूचे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार दिलीप रामदास यादव, अश्रफ हमीद शेख (३७) याला सिन्नर येथून जाळ्यात घेतले. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
३२ दारूची दुकाने फोडली:
मुख्य म्होरक्या अश्रफ हा सिन्नरच्या पांडवनगरीमधील रहिवासी आहे. त्याच्यावर राज्यभरात देशी दारूची दुकाने फोडून चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. एकूण त्याच्यावर याप्रकारचे ३२ गुन्हे दाखल आहेत. अश्रफ हा फक्त देशी दारूचे दुकान फोडून चोरी करतो आणि चोरीसाठी फक्त पेट्रोल कारचा वापर करतो, असे तपासात उघडकीस आले आहे.