नाशिक (प्रतिनिधी): शहरात शनिवार (दि. २९) ते १२ ऑगस्ट या पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जमावबंदी, आंदोलने, निदर्शने करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी (दि. २७) आदेश काढले आहेत.
राजकीय परिस्थिती, समान नागरी कायद्यासंदर्भात होत असलेली चर्चा, विधानसभा सदस्यांच्या अपात्रेचा निकाल या पार्श्वभूमीवर उमटणारे पडसाद, मणीपूर घटनेच्या निषेधासाठी होणारी आंदोलने आणि मोहरम सण अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
या कालावधीत शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी जमणे, आंदोलने, निदर्शने, उपोषण आंदोलनास करण्यास सक्त मनाई आहे. पाचपेक्षा अधिक लोक जमा होणार असल्यास पोलिस आयुक्तांची परवानगी अनिवार्य आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.