
नाशिक (प्रतिनिधी): नामांकित कंपनीचे डुप्लिकेट पार्ट विक्री करणाऱ्या मोबाईल दुकानांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत ४ दुकानांतून ५ लाख ६९ हजारांचे पार्ट जप्त करण्यात आले. गुरुवारी (दि. १०) गुंडाविरोधी पथकाने एमजी रोडवर ही कारवाई केली.
कुंदन बेलोसे दिलेल्या तक्रारीनुसार, प्रधान पार्क, एमजीरोड येथील मोबाइल दुकानात अॅपल कंपनीच्या मोबाईलच्या अॅक्सेसरीजचे बनावटीकरण करुन अनधिकृतपणे विक्री होत असल्याची तक्रार दिली होती.
गुंडाविरोधी पथकाने देवसी भल्लाराम यांचे अंबिका मोबाईल या दुकानातून १ लाख ८३ हजार, सुरेश चौधरी याच्या शिव मोबाईल दुकानातून ६७ हजार ५००, तेजस कोल्हे याच्या युनिक मोबाईल दुकानातून १ लाख ५ हजार, दीपक वाघ यांच्या विनस मोबाईल दुकानातून २ लाख १२ हजारांचे, बैंककव्हर, अॅडप्टर, एअर पॉड आदी सुटे पार्ट असा एकूण ५,६९,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.