नाशिक: प्रभाग २४ मधील पाणी पुरवठा सुरळीत करणार; खड्डे, पावसाळी गटारची समस्या सोडविणार

महापालिका आयुक्तांचे आश्वासन

नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग क्रमांक २४ मधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही शुक्रवारी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद््गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा आदी भागातील नागरिकांना गेल्या एक वर्षापासून भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पाणीपट्टीत पन्नास टक्के सवलत द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने नागरिकांच्या वतीने केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने शुक्रवारी शिष्टमंडळाने आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली, पाणीटंचाईची माहिती दिली, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांची समस्या सांगितली. गेल्या दहा वर्षांपासून अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिली, तरीही प्रभागात बहुतांश भागात पावसाळी गटार केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या सर्व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मनोज पाटील, रवींद्र सोनजे, किरण काळे, महेश जाधव, नवलनाथ तांबे, शिवाजी मेणे, सचिन रोजेकर, गजेंद्र मुळे, संदीप गहिवाड, मनोज वाणी यांच्यासह रहिवाशी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790