नाशिक (प्रतिनिधी): ठक्कर बाजार बसस्थानकात मद्यपीने हॅप्पी होली म्हणत पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्याचा सोमवारी (दि. २४) सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २१) रात्री ८.३० वाजता बस स्थानकात स्वच्छतागृहाचे कर्मचारी विजय गेहलोत यांना शुभम जगताप याने पेटवून दिले होते. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला इदगाह मैदानात पाठलाग करत ताब्यात घेतले होते. त्याचवेळी त्याने ‘हॅप्पी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले’ अशा शब्दांत संशयिताने कबुली दिली. विजय गेहलोत यांची मुलगी निशा गेहलोत यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मृत्यू झाल्याने खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले. संशयित पोलिस कोठडीत आहे. वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करत आहे.