
नाशिक (प्रतिनिधी): डाऊन सिंड्रोम असणाऱ्या रुग्णांना आरोग्य, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर पाठबळाची आवश्यकता असते. त्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्यास डाऊन सिंड्रोम असलेल्या रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतात. अशा रुग्णांच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयातील शीघ्र हस्तक्षेप केंद्रात नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले.
जन्मत: शरीरातील गुणसूत्रांच्या विभाजनात होणाऱ्या त्रुटीमुळे डाऊन सिंड्रोम हा आजार होतो. साधारणपणे ७०० नवजात बालकांमध्ये एक एवढे याचे प्रमाण आहे. २१ मार्च हा दिवस जगात डाऊन सिंड्रोम दिन म्हणून साजरा केला जातो. ‘आमच्या समर्थन प्रणालीमध्ये सुधारणा करा’,अशी या वर्षाची संकल्पना होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. अनंत पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत सुरवसे, डॉ. नीलेश अहिरे, डॉ. मोहन वारके, जिल्हा बालरोग तज्ज्ञ असोसिएशनचे डॉ. सागर भालेराव, डॉ. अतुल बोंडे आदी उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे म्हणाले की, जन्मत:च शरीरातील जनुकीय त्रुटींमुळे बालकांमध्ये डाऊन सिंड्रोम या आजाराची लक्षणे जाणवतात. त्यामुळे बौद्धिक व शारीरिक विकासात काही समस्या निर्माण होऊ शकतात. वैद्यकीय व्यावसायिक रक्ताच्या नमुन्यांद्वारे गुणसूत्रांची तपासणी करून या आजाराचे निदान करतात. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या वतीने डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बालकांची तपासणी करण्यात येते.
त्यानुसार आवश्यक भौतिक उपचार केले जातात. डॉ. सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गोरे यांनी डाऊन सिंड्रोम याविषयीची माहिती सादर केली दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कविता जुनेजा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. भालेराव, डॉ. शीतल पगार, डॉ. बोंडे यांनी व्याधीग्रस्त मुलांसाठी कविता सादर केली. डॉ. मधुरा धारणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सारिका वाघ यांनी आभार मानले.
![]()


