नाशिक: व्यापाऱ्याची लुटमार; 60 हजारांची रोकड हिसकावून नेली

नाशिक (प्रतिनिधी): मुक्तीधाम येथील शिवम कॉम्प्लेक्समधील व्यापारी दुकान बंद करून मोपेडवरून घरी जात असताना विहितगाव नदी पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांची लुटमार करीत ६० हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश परसराम ललवाणी (रा. विहितगाव, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शिवम कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे महेश कॉस्मॅटिक्सचे दुकान आहे.

हे ही वाचा:  थंडीचा जोर ओसरला; राज्यात तीन दिवस पावसाची चिन्हे

सोमवारी (ता.४) रात्री ते दिवसभराची व्यवसायाची रक्कम व बँकेचे कागदपत्रे भरून बॅग मोपेडच्या खालील हुकाला अडकवली. त्यानंतर ते दुकानात काम करणारी मुलगी दामिनी आढाव (रा. गोरेवाडी) हिच्यासह घराकडे निघाले. रात्री साडेदहाच्या सुमारास ते विहितगाव नदी पुलावर असताना अर्धवट क्रमांक असलेल्या दुचाकीवरून (४३९२) आलेल्या दोघांनी त्यांना रोकले आणि आम्ही पोलिस आहोत, गाडीच्या डिक्कीत काय ते दाखव असे म्हणाले.

हे ही वाचा:  नाशिक: सिंहस्थ नियोजनाची आज होणार बैठक

त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली असता, संशयितांनी ललवाणी यांना धक्काबुक्की करीत मोपेडला अडकवलेली पैशांची बॅग हिसकावून घेत बिटको पॉईटच्या दिशेने दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार जितेंद्र माळी हे तपास करीत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५९२/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790