नाशिक (प्रतिनिधी): एम.जी. रोडवरील मोबाइल विक्रीच्या काही दुकानांमधून सर्रासपणे ॲपलच्या नावाखाली कॉपी केलेले बनावट ॲक्सेसरीजची विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार शनिवारी (दि. ५) गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने टाकलेल्या छाप्यातून उघडकीस आला. सुमारे ७ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत मोबाइल ॲक्सेसरीज विक्रीच्या दुकानांमधून काही विक्रेते हे ॲपल कंपनीचे बनावट सुटे भाग ग्राहकांना विक्री करून फसवणूक करत कॉपीराइट कायद्याचा भंग करत असल्याचे म्हटले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार शनिवारी युनिट-१च्या पथकाने एम.जी. रोडवरील मनीष टेलिकॉम, ओमसाई मोबाइल, मातोश्री मोबाइल, माँ अंबे मोबाइल शॉपी या दुकानांवर छापा टाकला. यावेळी या दुकानांमध्ये आयफोनचे हुबेहूब नक्कल केलेले मोबाइलचे ॲक्सेसरीज आढळून आले.
याप्रकरणी संशयित दुकान मालक हरदाराम चौधरी (३५), हुकूमसिंग राजपूत (२८), मुकेश प्रजापती (२४), हितेश चौधरी (२४) या चौघांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१.६३नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील चार दुकानांमधून अनुक्रमे प्रत्येकी ३ लाख ३८ हजार ४०० रुपये, २ लाख १६ हजार ४०० रुपये, ६४ हजार ५०० रुपये आणि ६८ हजार रुपये असा एकूण ७ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.