🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: चौथे विश्व मराठी संमेलन: बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – मधु मंगेश कर्णिक

नाशिक। दि. २६ फेब्रुवारी २०२६: बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे केले.

चौथे विश्व मराठी संमेलन 27 फेब्रुवारीपासून मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज बोली भाषांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उदघाटन श्री. कर्णिक यांच्या हस्ते महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: पूर्वतयारीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. मिलिंद जोशी, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.

श्री. कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्र हे साहित्य, कला, संगीताला महत्व देणारे राज्य आहे. हजारो वर्षांपासून बोली भाषा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आहेत. बोली भाषेला महत्व दिले, तर मराठी भाषा समृद्ध होईल. राज्य शासनाने सुरू केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या दोघांना अटक; ५८ गुन्हे उघड व ३० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, मराठी भाषा ही ज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी. बोली भाषांना संजीवनी मिळाली, तर मराठी ही ज्ञान भाषा होईल. बोली भाषा समृद्ध झाल्या, तर मराठी भाषा समृद्ध होईल. त्यासाठी बोली भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी. आठवीच्या वर्गापासून भाषा विज्ञान शिकवावे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचे नाशिक हे साहित्य तीर्थ आहे. बोली भाषांचे महत्व नाकारून चालणार नाही. बोली भाषा या मराठी भाषेसाठी जीवनवाहिन्या आहेत, असे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  महापालिका आयुक्तांच्या बनावट सहीचे नियुक्तीपत्र देऊन फसवणूक; फरार आरोपीला धुळ्यातून अटक

यावेळी श्री. कर्णिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, कवी प्रकाश होळकर, सुरेखा बोऱ्हाडे, रमेश पडवळ, डॉ. प्रतिभा जाधव, विद्या सुर्वे, सुनील ढगे, रवींद्र कदम, डॉ.विजय काकतकर, चारुदत्त दीक्षित आदींचा सत्कार करण्यात आला. निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ढवळ यांनी आभार मानले. यावेळी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरे संसार संसारने जिंकली मने:
बोली भाषा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिणाबाईंची गाणी आणि कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790