news

नाशिक: मतदानासाठी 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत द्यावी- कामगार उपायुक्त

नाशिक। दि. १० जानेवारी २०२६: नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदान क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मतदार कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित उद्योजक व आस्थापनांनी त्यांच्या उद्योगात, आस्थापनेत कार्यरत मतदार कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगार सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त वि. ना. माळी यांनी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग !

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले, तरी ही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. (उदा. खासगी कंपन्या, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स इत्यादी).

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ४० किलो गांजाप्रकरणी दोघांना १० वर्षांची सक्तमजुरी

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापकांनी या निर्णयाचे अनुपालन काटेकोरपणे होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

तक्रारीसाठी संपर्काचा पत्ता असा:
कामगार उपायुक्त, नाशिक विभाग, नाशिक, उद्योग भवन, गाळा क्रमांक १८/१९, चौथा मजला, आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर, नाशिक यांच्याकडे प्रत्यक्ष संपर्क साधून अथवा dyclnsk@yahoo.in या ई मेल आयडीवर तक्रार दाखल करावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790