नाशिक। दि. ९ ऑक्टोबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती 12 ऑक्टोबर, 2026 पर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यानुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नोंदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी 10 व 11 ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
या विशेष शिबिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारणार आहेत. या मोहिमेंतर्गत फॉर्म नं.6, 7, 8 भरण्यासाठी 12 ऑक्टोबर,2026 ही शेवटची तारीख आहे. सर्व पात्र नवमतदार यांनी नाव नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या परिसरातील बीएलओ यांचा तपशील जाणून घेण्यासाठी किंवा नाव नोंदणीसंदर्भात इतर माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील हेल्पलाईन क्र. 0253-2310523 या क्रमांकावर संपर्क साधावा.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नवमतदारांना, तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना नमुना-६ व घोषणापत्र भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना-८ सोबत घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. तसेच संबंधित मतदारसंघातील मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याबाबत नमुना-७ भरून हरकत नोंदविता येईल.
ऑनलाइन सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, मतदार नोंदणी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीनेही पात्र नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहेत. विशेषतः १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र युवक तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेले पात्र नागरिक यांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा. नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


