नाशिक (प्रतिनिधी): शहरात कोरोनाबाधीतांची वाढती संख्या बघता प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. नाशिक शहरात आजपासून (दि. ३० जून २०२०) सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
या नियमातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्य शासनाने ३१ जूलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. विविध जिल्हयांमध्ये पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाशिकमध्ये पण पुन्हा लॉकडाऊन करावा अशी मागणी नागरिक करत होते. शहरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.