नाशिक (प्रतिनिधी): 9 गुंठे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती स्वत:च्या नावावर करून घेत एका वृद्धाची फसवणूक करणाऱ्या वकिलासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दत्तात्रय विश्वनाथ गुरव (वय 63) हे नाशिकरोड येथील गायके कॉलनीत गगनगिरी हौसिंग सोसायटीत राहतात.
फिर्यादी गुरव व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे 9 गुंठे जमीन आहे. आरोपी विजय रामचंद्र सोनवणे (वय 69, रा. कमल निवास, वास्को हॉटेलजवळ, नाशिकरोड), डॉ. राजेंद्र हरी कोतकर (वय 62, रा. संगमेश्वरनगर, चेहेडी पंपिंग, नाशिक), विश्वास माधव राऊत (रा. जेलरोड, नाशिकरोड), एम. व्ही. पटेल (रा. दत्तमंदिर, नाशिकरोड), श्रीकांत भगतराम साधवानी (रा. नाशिकरोड) व ॲड. सुरेश तुकाराम भोसले (वय 69, रा. ओम्नगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी संगनमत करून फिर्यादी गुरव व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली.
त्या कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वरील सहा आरोपींनी परस्पर स्वत:च्या नावे करून घेत फिर्यादी गुरव व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 26 मे रोजी नाशिकरोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.