नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास हॉस्पिटल ओनर असोसिएशनने नकार दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
या पत्राचा मसुदा पुढीलप्रमाणे,
असोसिएशनने दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, “आपण गेल्या दीड वर्षापासून कोविड या साथीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासकीय स्तरावरून आपण केलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आम्ही सर्व नाशिक मधील खाजगी रुग्णालयात सेवा दिली. मृत्युदर कमी राखण्यात आणि रुग्ण बरे होण्यात आपल्या सर्वांचे योगदान आहे हे आपण मान्य करालच. परंतु आम्हा सर्वाना काही समस्या आहेत. आम्ही सर्वजण आणि आमचा कर्मचारी वर्ग आता मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या थकलो आहोत. तसेच आता कोविड रुग्णसंख्या कमी झाली आहे. तेवढे रुग्ण सांभाळणे शासकीय आणि निमशासकीय आरोग्य यंत्रणांना सहज शक्य आहे. कारण त्यासुद्धा तेवढ्याच दर्जेदार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व खाजगी कोविड रुग्णालये आता सदर सेवा बंद करत आहोत. भविष्यात जर पुन्हा गरज पडली तर आम्ही सर्वजण सेवा देऊ. कृपया आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करावे ही विनंती.”
या पत्राची प्रत असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांनाही पाठवली आहे. मात्र “आम्ही थकलो आहोत” हे एवढंच कारण आहे की अजून काही, यावर नाशिक शहरातील नागरिकांमध्ये आता चर्चा सुरु आहे…!