नाशिक (प्रतिनिधी): मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून कंपनीच्या दोन जणांना सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी व कार्यालयात असताना आरोपी हरिसिंग आरतीसिंग, दत्ता, अनन्या गुप्ता, श्री विश्वनाथन व इतर अज्ञात इसमांनी कॅनयॉन अॅसेट्स या नामांकित कंपनीचे साधर्म्य असलेले नाव लावून, तसेच या मूळ कंपनीचे संचालक यांचे नाव लावून आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करून एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. हा ग्रुप तयार करून त्यातील अनेक सदस्यांनी फिर्यादी यांना मोठा नफा झाल्याचे संदेश वारंवार पाठविले व त्यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी फिर्यादी यांना त्यांनी पाठविलेल्या बँक खात्यांत रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर एका लिंकवर बनावट कंपनीचे अॅप दाखवून व फिर्यादी यांची मूळ गुंतवणूक रक्कम १ कोटी १३ लाख १० हजार व त्यावरील नफा परत न करता फसवणूक केली, तसेच यातील सरदेशमुख यांनाही अपस्टॉक्स या नामांकित कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्यावर गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची १५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. अशा प्रकारे यातील फिर्यादी यांची १ कोटी १३ लाख १० हजार व साक्षीदार सरदेशमुख यांची १५ लाख ८० हजार अशी मिळून एकूण १ कोटी २८ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार दि. ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.