नाशिक (प्रतिनिधी): पॉलिसी बंद करून त्यातील रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन अनोळखी इसमांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे ५८ वर्षीय असून, त्यांना पॉलिसी ऑफिसमधून फोनद्वारे बोलत असल्याचे भासवून संशयित राहुल, अमित अग्रवाल व अजय नावाच्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीशी संपर्क साधला. “पॉलिसी बंद करण्यासाठी व सदर पॉलिसीमध्ये भरलेली रक्कम परत मिळवून देतो”, असे सांगून तीनही अनोळखी इसमांनी त्यांना यूपीआय, आयडीवर विविध रकमा भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी दि. १५ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे एकूण ५ लाख ४० हजार ११९ रुपये जमा केले.
या तीनही आरोपींनी मिळवून फिर्यादीची ऑनलाईनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.