नाशिक (प्रतिनिधी): शेअर बाजारातून भरघोस नफा मिळवण्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्या नाशिकमधील दोन नागरिकांची तब्बल ५६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एनसीसीआरपी पोर्टलच्या माध्यमातून ९ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्च महिन्यात एका महिलेसह एका पुरुषाशी अनोळखी सायबर भामट्यांनी संपर्क साधला. त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले आणि विविध शेअर्स तसेच IPO (प्राथमिक समभाग विक्री) मध्ये मोठा परतावा मिळेल, असा बनाव करून त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले.
२० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत संबंधित दोघांकडून विविध बँक आणि वॉलेट खात्यांमध्ये पैसे भरायला लावण्यात आले. यामध्ये एकट्या पुरुष गुंतवणूकदाराची ५० लाख रुपयांची तर महिलेची ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
फसवणूक लक्षात आल्यानंतर दोघांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करत ९ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम फ्रिज करण्यात सायबर पोलिसांनी यश मिळवलं आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.