नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२५: बिटकॉइनचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी आणखी एका नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढत सुमारे १५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील विविध नागरिकांना शेअर मार्केटमध्ये तसेच बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहे. बुधवारी (दि. ६) ते ८ ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीला अशाचप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञातांनी संपर्क साधला. दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून मॅसेजद्वारे संवाद साधून एका संकेतस्थळाची माहिती देत त्यावरून बिटकॉइन खरेदी करण्यास सांगितले.
बिटकॉइनच्या व्यवहारातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेगवगेळ्या बँकांच्या खात्यावर सुमारे १५ लाख ८५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. यानंतर फिर्यादीला कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही किंवा संबंधितांनी पैसेही परत केले नाही, यामुळे फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने फिर्यादीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.