नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील काही ठिकाणांवर सायंकाळच्या वेळी टवाळखोरांची गर्दी होऊन ‘रोमिओगिरी’ केली जात असल्याने, त्याच परिसरात शहर पोलिसांनी बुधवारी (ता.२९) रात्री कोम्बींग-ऑल आऊट ऑपरेशन राबविले.
पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या या कारवाईमुळे टवाळखोरांची चांगलीच फजिती उडाली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेताच शहरातील टवाळखोरांविरोधात दंडूक्याचा बडगा उगारला आहे. गेल्या मंगळवारी (ता.२८) शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत कोम्बींग -ऑल आऊट ऑपरेशन राबवून तब्बल ५६५ टवाळखोरांविरोधात कारवाई केली होती.
सलग दुसऱ्या दिवशीही आयुक्तांच्या आदेशान्वये परिमंडळ एक व दोनमध्ये पुन्हा सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कोम्बींग – ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील टवाळखोरांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.
ठराविक स्पॉटवर कारवाईपरिमंडळ एकमध्ये कॉलेजरोड, आसाराम बापू पुल, अशोक मार्ग तर, परिमंडळ दोनमध्ये अंबड लिंक रोड, इंदिरानगर जॉगींग ट्रॅक, जेलरोड याठिकाणी सायंकाळच्या वेळी टवाळखोरांची गर्दी होत असते.
त्यामुळे याच स्पॉटला टार्गेट करीत पोलीसांनी याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली.
यावेळी टवाळक्या करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, रॅशड्रायव्हिंग, कर्णकर्कश हॉर्न-सायलेन्सर दुचाकी चालकांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
![]()


