नाशिक (प्रतिनिधी): सराफी शोरूममध्ये काम करणाऱ्या एका सेल्समनने चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती व वस्तू चोरून घेऊन जात सुमारे ७३ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नितीन गणपतराव पवार (रा. खांदवेनगर, आनंदवल्ली, नाशिक) हे गंगापूर रोडवरील डॉन बॉस्को सेंटरजवळ असलेल्या पीएनजी ब्रदर्स या सराफी शोरूमचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित आरोपी सूरज धनेश वारुंगसे (वय ३५, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव, नाशिकरोड) हा या शोरूममध्ये सेल्समन म्हणून कामाला होता.
वारुंगसे याने दि. १ नोव्हेंबर २०२२ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत पीएनजी ब्रदर्स शोरूममध्ये काम करीत असताना ६१ लाख ३४ हजार १६१ रुपये किमतीच्या देव-देवतांच्या मूर्ती, ११ लाख ८४ हजार ५७६ रुपये किमतीचे ११ किलो ६१६ ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन, १० हजार ३०० रुपये किमतीचे चांदीचे देव, पूजेकरिता वापरण्यात येणारे साहित्य अशा एकूण ७३ लाख २९ हजार ३७ रुपये किमतीच्या चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती व वस्तू घेऊन जाऊन त्याचा अपहार केला. याप्रकरणी संशयित आरोपीला २३ डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सेल्समन सूरज वारुंगसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१०/२०२४)