नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोड वरील एका मोकळ्या जागेत मंगळवारी (ता.२३) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
यामागे काही घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
मंगळवारी (ता.२३) रासबिहारी लिंकरोड वरील मिरद्वार लॉन्स शेजारी मोकळ्या जागेत येथून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकास युवती मृतावस्थेत असल्याचे आढळून आले.
याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी दोरीने गळा आवळण्यात आल्याच्या खुणा, तसेच हाताला काही जखमा झाल्याचे प्राथमिक चौकशीत माहिती सूत्रांनी दिली आहे.
यामागे घातपात असण्याची शक्यता असून, पोलिस या घटनेचा कसून शोध घेत आहेत. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.