नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
अजय नवनाथ चारोस्कर (वय २३, रा. चांदोरी, निफाड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित कला विद्याशाखेतून पदव्युत्तर पदवीधारक असला, तरी बेरोजगारीमुळे तो चोरी करीत असल्याचे तपास समोर येत आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयात विविध शासकीय यंत्रणांच्या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा केंद्रात दुपारी तीन ते सहा या सत्रावेळी पार्किंगमधील वाहनांच्या डिकीतून चोरी झाल्याचा प्रकार घडला.
अहमदनगर येथील २९ वर्षीय विशाल वसंत गिते यांनी याबाबत म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या बॅगेतील दोन मोबाइल, दोन घड्याळे व चांदीचे दागिने लंपास झाले. २३ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे, सुधीर पाटील आणि पोलिस अंमलदार देवराम चव्हाण यांनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संशयित त्यात दिसून आला.
संशयिता संदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकाला देण्यात आली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेरील एका झाडाखाली संशयित चारोस्कर उभा असल्याचे पोलिसांना समजले. ताब्यात घेतल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. ‘एम. ए.’ पर्यंत शिक्षण झाले असले, तरी जेमतेम पैशांसाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी अंमलदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.