नाशिक (प्रतिनिधी): शहरात तोतया पोलिस पुन्हा सक्रिय झाले असून वृध्द आणि महिलांना गाठून भामटे अलंकार पळवित आहेत.
गुरूवारी (दि.१४) अशीच घटना सिडकोतील शिवाजीनगर भागात घडली. ड्रग्ज सापडले आहे अशी बतावणी करीत दुचाकीस्वार भामट्यांनी वृध्दाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून हातोहात लांबविल्या.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर शंकर कापडणे (७६ रा. कुबेर लॉन्स मागे खोडेमळा) यांनी फिर्याद दिली आहे. कापडणे गुरूवारी सकाळच्या सुमारास शिवाजी चौक भाजी मार्केट कडून शिवाजी पुतळयाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट अडवित पोलिस असल्याची बतावणी केली. यावेळी त्यांनी रमेश पाटील याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगून अंगावरील अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला दिला.
यानंतर हातातील सुमारे ३४ हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून अंगठ्या हातोहात लांबविल्या. ही बाब कापडणे घरी गेल्यानंतर उ़घडकीस आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.