नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन दिवसांत ३६ इसमांवर कारवाई करत २२ लाखांचे मद्य जप्त केले. निवडणूक आणि मतदान, मतमोजणीपर्यंत ही कारवाई सुरू राहाणार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात अवैध मद्य विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आयुक्त संदीप कर्णिक यांनी मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
या सूचनांनुसार परिमंडळ १ व २ मधील आडगाव, म्हसरुळ, पंचवटी, सरकारवाडा, मुंबईनाका, भद्रकाली, गंगापूर, अंबड, इंदिरानगर, सातपूर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांत ३६ इसमांवर कारवाई केली. २२ लाखांचे मद्य जप्त करण्यात आले. विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.