नाशिक (प्रतिनिधी): वडाळारोडवरील जेएमसीटी स्कूलमध्ये सातवीतील विद्यार्थ्यास मारहाण करणे शिक्षकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पर्यवेक्षकाकडे दाद मागूनही दाद न मिळाल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फारूक सर व आरिफ मन्सुरी अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयित शिक्षकांची नावे आहेत. याबाबत शेख (रा.चौक मंडई जुनेनाशिक ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांचा मुलगा हा वडाळारोडवरील जेएमसी स्कुलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या ७ जानेवारी रोजी तो नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत गेला होता. त्या दिवशी शाळेत अन्युअल स्पोर्टस डे साजरा केला जात होता. वर्गात सर्व विद्यार्थी बसलेले असतांना तेथे फारूख सर आले. सर वर्गात आल्याने सर्व विद्यार्थी उभे राहिले होते. त्यानुसार सदर विद्यार्थी हाही उभा राहिला होता. शिक्षकांनी मुलांना बसायला लावले मात्र मोहम्मद हा खाली बसला नाही त्यामुळे सदर शिक्षकाने त्यास काठीने बेदम मारहाण केली.
या घटनेत विद्यार्थ्याच्या ओठास, उजव्या पायास व डाव्या खांद्यास गंभीर दुखापत झाली आहे. शाळा सुटल्यानतर दुपारी घरी पोहचलेल्या मोहम्मद याने आपबिती आपल्या कुटुंबियांकडे कथन केल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली. मात्र दाद मिळाली नाही. उलट दुस-या दिवशी शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यास पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी यांनी शाळेतून काढून टाकण्याची व ब्लॅक लिस्टला टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८३/२०२५)