नाशिक: तोतया आयपीएस मिश्रावर अजून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३६ लाखांना घातला गंडा…

नाशिक (प्रतिनिधी): आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या मिश्रावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्याने शहरातील एका लॉन्ड्री व्यावसायिकाला रेल्वेच्या लॉन्ड्रीचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून ३६ लाखांचा गंडा घातला. व्यावसायिकाने पैशांची मागणी केली असता तोतया मिश्राने त्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गौरव रामेश्वर मिश्रा (३७, रा. मिश्रा हाऊस, महालक्ष्मीनगर, कामटवाडा, अंबडलिंक रोड) असे संशयित तोतयाचे नाव आहे. दर्शन लल्लुराम कनोजिया (४३, रा. गंगा हाईट्स, गजानन नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०१७ ते १३ ऑक्टोबर २०२४ यादरम्यान, संशयित मिश्रा हा कनोजिया यांच्या अभियंतानगर येथील योगीराज अपार्टमेंट येथे भेटण्यासाठी आला आणि त्यांच्या लाँन्ड्री व्यवसायाची माहिती घेत पंचवटीतील नवनाथ नगरमधील फॅक्टरीलाही भेट दिली होती. यावेळी संशयित मिश्राने रेल्वेतील कपडे धुलाईच्या ठेक्याची माहिती देत ‘मी भारतीय रेल्वेमध्ये आयपीएस दर्जाचा अधिकारी असून सध्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहे,’ असे सांगत त्याचे ओळखपत्रही दाखविले.

हे ही वाचा:  नाशिक: बनावट शासकीय नियुक्तीपत्र देत गंडा; भामट्याकडून 8 लाखांची फसवणूक

आयपीएस असल्याचा थाटही त्याने कनोजिया यांना दाखविल्याने त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. महानिरीक्षक असल्याने मला व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे पत्नी प्रीती मिश्रा हिच्या नावे अथर्व कन्स्ट्रक्शन नावाने रेल्वेचे टेंडर घेत असल्याचेही सांगत, रेल्वेत तुम्हालाही चांगले टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याकडून ३६ लाख ६४ हजार रुपये उकळले.

हे ही वाचा:  नाशिक: रात्री बेरात्री पादचाऱ्यांना लुटणाऱ्या तिघांना बेड्या

कंत्राट न मिळाल्याने मिश्राकडे पैसे परत मागितले असता, त्याने त्यांच्याच घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या महिन्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तोतया मिश्राच्या घराची झडती घेतली असता, महागडे मोबाईल, लॅपटॉप, ‘एसीपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश, रेव्हेन्यू अधिकाऱ्याचा गणवेश, धातूचे लोगो, बंद अवस्थेतील दोन वायरलेस सेट व पोलिस व एसीबीची सरकारी मोहोर असलेले कागदपत्रे जप्त केली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, सिडकोतील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक विठ्ठल वाकडे यांनाही रेल्वेतील टेंडरचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७३८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790