नाशिक (प्रतिनिधी): कॉम्प्युटर खरेदी करून त्यापोटी दिलेले पोस्ट डेटेड चेक बाऊन्स करून शहरातील १८ कॉम्प्युटर विक्रेत्यांची सुमारे ४८ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जयेश संजय पेंढारकर (रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, तिडकेनगर, नाशिक) यांचा कॉम्प्युटर विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी मंदार पाटील याने कॉम्प्युटर खरेदीपोटी दि. १७ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान दिलेले चेक पेंढारकर यांनी बँकेत टाकले असता ते चेक बाऊन्स झाले. म्हणून फिर्यादी यांनी आरोपी पाटील याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. म्हणून फिर्यादी यांनी त्याच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज केला असता त्याने रिप्लाय दिला. त्यावेळी पेंढारकर यांनी चेक बाऊन्सबाबत विचारले असता त्याने सांगितले, की माझ्या पार्टनरचा अपघात झाला असून, तो त्यात मयत झाला आहे. फिर्यादी यांची खात्री पटावी म्हणून आरोपीने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अपघाताचे फोटो पाठविले.
तेव्हा पाटील म्हणाला, की मला जे चेक मिळाले, ते बाऊन्स झाले आहेत. त्याबाबत समोरच्या पार्टीकडे पैसे मागण्यासाठी सुरतला आलो आहे. तेव्हा त्याने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपला त्याचे चेक बाऊन्स झाल्याचे फोटो पाठविले. त्यानंतर फिर्यादीनेदेखील त्यावर विश्वास ठेवून दोन-तीन दिवस वाट पाहिली; परंतु त्यानंतर आरोपीचा फोन व व्हॉट्सअॅपदेखील बंद होते. या प्रकाराबाबत पेंढारकर हे त्यांचे दुकानमालक यांना वारंवार कल्पना देत होते. त्यानंतर त्यांना असे समजले, की आरोपी मंदार पाटील यांना इतर कॉम्प्युटर विक्रेत्यांकडूनदेखील माल घेऊन त्यांनाही पोस्ट डेटेड चेक दिले असून, तो सध्या पसार झाला असल्याचे समजले.
मंदार पाटील याच्या शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर येथील आय मॅक्स टेक्नॉलॉजी नावाच्या दुकानावर जाऊन पाहिले असता ते दुकानदेखील बंद असल्याचे दिसले. त्यानंतर फिर्यादी यांना आरोपी मंदार पाटील याने त्याच्या राहत्या ठिकाणाबाबत, तसेच त्याच्या आधार कार्डावर असलेल्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता पाटील हा कधीही त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजले.
त्यानंतर फिर्यादी जयेश पेंढारकर यांच्यासह नाशिकमधील १७ कॉम्प्युटर विक्रेत्यांचा विश्वास संपादन करून एक महिन्याचे पोस्ट डेटेड चेक देऊन फिर्यादी पेंढारकर यांना १७ लाख ५४ हजार ८५० रुपयांच्या रकमेसह इतर १७ कॉम्प्युटर दुकानदारांची मिळून एकूण ४८ लाख ३३ हजार २४२ रुपयांचे कॉम्प्युटर खरेदी करून आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
(सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८१/२०२४)