नाशिक, दि. २९ मार्च २०२६ : पोलिस असल्याचे भासवून दोन वृद्ध महिलांची फसवणूक करत त्यांच्या गळ्यातील सुमारे १.४० लाख रुपयांचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना सौभाग्यनगर, लॅम रोड परिसरात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्या सायंकाळी सुमारे ७ वाजता नाना-नानी पार्कमध्ये त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
संशयितांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत परिसरात गस्त सुरू असल्याची बतावणी केली. पुढे एका महिलेला चाकू मारल्याची घटना घडल्याचे सांगून, सुरक्षेच्या कारणास्तव गळ्यातील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. भीतीपोटी दोन्ही महिलांनी दागिने काढून दिले. त्यानंतर बर्डे यांनाही दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगत तेही आरोपींनी घेतले.
हातचलाखी करत संशयितांनी दागिन्यांच्या ऐवजी कागदात लहान दगड ठेवून ते महिलांच्या हातात दिले आणि घरी गेल्यावर उघडण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरून आरोपी पसार झाले. घरी आल्यानंतर दागिने तपासले असता दगड असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
![]()

