नाशिक। दि. २८ जून २०२५: दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या मुलाचा माता-पित्याने ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर, सातपूर येथे उघडकीस आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आई, वडील आणि बहिणीचा पती अशा तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पूजा विशाल पाटील (३४, रा. शिवाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, पती विशाल पाटील सकाळी ११ वाजता दारू पिऊन घरी आले. नशेत सासरे गोकुळ पाटील, सासू शशिकला पाटील आणि नंदोई उमेश काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने घरातील भांडे विक्री करण्यास जात असताना पतीचे आई, वडील आणि नंदोई काळे यांनी विशाल पाटील यास पकडून मारहाण केली.
मद्याच्या नशेत आवरले जात नसल्याने संशयितांनी ओढणीने दोन्ही हात बांधून गळा आवळला. आवाज दाबण्याकरिता सासूने तोंडावर उशी दाबून ठेवत पतीचा खून केला. काही वेळ घरातच ठेवून रात्री ८ वाजता पतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासत मृत घोषित केले. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १६६/२०२५)