नाशिक | दि. २८ जून २०२५:अल्पवयीन मुलीला धमकी देत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंबड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, एप्रिल २०२४ ते जून २०२५ या कालावधीत तिला तिच्या पतीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पालकांच्या देखरेखीखालून तिला पळवून नेण्यात आले. पीडितेच्या सासऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देत तिचे वय २५ वर्ष असलेल्या तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावले.
लग्नानंतर पतीने पीडितेच्या अल्पवयाचा व अज्ञानाचा गैरफायदा घेत वारंवार शरीरसंबंध ठेवले. परिणामी ती गर्भवती राहिली आणि १ जून २०२५ रोजी तिने मुलाला जन्म दिला. दरम्यान सासू व जेठाच्या सततच्या शिवीगाळी व मारहाणीचा पीडितेला सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर सासरे व जेठ यांनी देखील तिचा छळ करत “तुझ्या घरच्यांना समाजात राहू देणार नाही,” अशा धमक्या दिल्या. या संपूर्ण प्रकरणाची नोंद भद्रकाली पोलीस ठाण्यात झाली असून, पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.