नाशिक। दि. २७ जून २०२५: शहर व परिसरात चेन मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपन्यांच्या नावांचा वापर करत व्यवसायाच्या संधीचे जाळे टाकून एका नोकरदाराकडून तब्बल २ लाख १५ हजार रुपये भामट्यांनी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
गंगापूररोडवरील लोकमान्यनगर येथील फिर्यादी प्रतिक पांडुरंग सुर्यवंशी (३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते जिथे नोकरी करत होते. तेथील व्यवस्थापक संशयित प्रसाद कोळपे (रा. शिवाजीनगर) याने त्याचा मित्र संशयित प्रज्ञेश प्रवीण शिंदे (रा. गंगापूररोड) याच्याशी भेट घालून दिली. यावेळी नवीन व्यवसायाची संधी असल्याचे सांगून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखविले. वेगवेगळ्याप्रकारे ऑनलाइन मिटिंग घेत प्रज्ञेश याने त्याचा मोठ्या कंपनीसोबतचा व्यवसाय असल्याचा बनाव केला.
त्यानंतर सुर्यवंशी यांनी प्रसादच्या खात्यावर ऑनलाइन २ लाख व रोख पंधरा हजार रूपये दिले. त्यानंतर पुन्हा इंरव्ह्यूचा बनाव रचून उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. व पैसे पार्ट दिले नाही. या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे अजून जर कोणा नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल डहाके करत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १६४/२०२५)