नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारीच्या गुन्ह्यात कर्जदारांकडून तब्बल २० टक्क्यांपर्यंत चक्रवाढ व्याज आकारून पिस्तुलाचा धाक दाखवत खंडणी उकळणाऱ्या व घरातील महिला, मुलींच्या अंगावर हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील ५ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यातील संशयित रोहित कुंडलवाल याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
संशयित रोहित याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तपासासाठी पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत. तसेच रोहित याचा भाऊ निखिल, वडील कैलास व आई यशोदाबाई यांच्याविरोधातही गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली. ९ दिवस उलटूनही ते हाती लागत नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही पोलिसांकडून सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
अवैध सावकार रोहित कुंडलवाल विरोधात १३ मार्चला भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. पिस्तुलाचा धाक दाखवत खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला ५ आणि नंतर ३ दिवसांच्या कोठडीनंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
![]()


