नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारातील हिंदुस्तान नगर परिसरात झालेला खून पहिल्या पत्नीने केल्याचे उघड झाले असून, मुलबाळ होत नसल्याने दोन भाऊ व त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने धारदार चाकूने छातीवर, पोटावर तब्बल बारा वार करून पतीला ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
भावसार मूलचंद पवार उर्फ बाल्या (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, या खून प्रकरणी मयत भावसार याची दुसरी पत्नी निरमा पवार हिने आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून संशयित आरोपी पत्नी सुनीता पवार, तिचा भाऊ राज शिंदे, आदित शिंदे, दीपक तसेच इतर एकजण अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन पहिल्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
आडगाव परिसरातील हिंदुस्तान नगर येथे शुक्रवारी (दि. १८) रात्री झालेल्या खुनाच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळणी विक्रीचा व्यवसाय असलेल्या भावसार याचा बारा वर्षापूर्वी सुनीता नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. मात्र, तिला मुलबाळ होत नाही म्हणून भावसार याने सुनीता हिची सावत्र बहीण असलेल्या निरमा नावाच्या महिलेशी विवाह केला होता.
भावसार दोन्ही पत्नींसमवेत गुजरात राज्यात वास्तव्यास होता. पहिली पत्नी आणि त्याच्यात नेहमी खटके उडायचे. सुनीता नाशिकला सिद्धपिंप्री रस्त्यावर राहणाऱ्या आई- वडिलांकडे आलेली होती तर भावसार हा दुसऱ्या पत्नीबरोबर शनिवारी (दि. १७) सकाळी नाशिकला सुनीता हिला भेटायला आला होता. रात्री आठ वाजता भावसार व सुनीता यांच्यात वाद झाला. त्यावेळी तेथे असलेल्या सुनीताचे भाऊ राजेश, आदित शिंदे, दीपक यांच्यासह इतर एकाने भावसार याला शिवीगाळ व मारहाण करीत धारदार चाकूने त्याच्या छातीवर, पोटावर तब्बल बारा वार केले.
पहिल्या पत्नीस अटक:
या घटनेत भावसारच्या डाव्या छातीच्या बाजूला वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडून घटनास्थळी मयत झाला. पोलिसांनी पहिली पत्नी असलेल्या संशयित आरोपी सुनीता हिला अटक केली आहे.