नाशिक (प्रतिनिधी): प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून घटस्फोट, १० लाखांची मागणी आणि अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. १२ ऑगस्ट २०२४ रोजी होळकर पुलावरून उडी घेत या युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी वडिलांनी न्यायालयात तक्रार केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती व मनोहर गवांदे (रा. उल्हासनगर) यांच्या तक्रारीनुसार, मुलगा प्रीतम गवांदे (रा. पाथर्डी फाटा) याचा एका युवतीसोबत प्रेमविवाह झाला होता.
लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतमची आर्थिक परिस्थिती खालावल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाले. मी तुझ्यासोबत प्रेम करून फसले, तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे, माझी मौज होत नाही. तुझ्या वडिलांकडून १० लाख घेऊन ये असा वाद घातला. घटस्फोट आणि पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नी कायम भांडण करत होती. तसेच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत घरात नको त्या अवस्थेत पाहिल्याने याचा धक्का बसल्याने मुलाने पुलावरून नदीत उडी मारली.