नाशिक। दि. १८ जुलै २०२५: रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला मारहाण करून हातातील मोबाइल खेचून पलायन करणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला दोघा चोरांनी बेदम मारहाण करत खिशातील तीन हजारांची रोकड आणि मोबाइल लुटून नेला. पद्मा रिक्षा स्टँड, सीबीएस येथे मध्यरात्री २.३० वाजता हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि बाळू कांबळे (रा. शांतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रिक्षा उभी करून थांब्यावर प्रवाशांची वाट बघत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरील (एमएच १५ केबी ९११६) दोघांनी बळजबरीने मोबाइल खेचून पलायन करत असताना कांबळे यांनी पाठलाग करत दोघांना पकडले.
मोबाइल परत घेत असताना संशयित दोघांनी कांबळे यांना बेदम मारहाण करत शर्टच्या खिशातून ३ हजारांची रक्कम काढून घेत ढकलून देत पलायन केले होते. पथकाचे शरद सोनवणे, शिवाजी शिंदे यांनी संशयिताचा चेहेडी गाव येथे माग काढत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत देवीदास शिवाजी कडाळे (राहणार: चेहेडी गाव, ग्राम पंचायतसमोर) असे नाव सांगितले. त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या पथकाने कारवाई केली.