नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी करणारे संशयित आरोपी कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल (सर्व. रा. पंचवटी) या पिता-पुत्रांनी पिस्तूलचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकावत व्याजाच्या नावाखाली ८० लाख रुपये उकळल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तिसरा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे.
अवैधरीत्या सावकारी करत नागरिकांना पिस्तूलचा धाक दाखवून तर कधी राजकीय वजन वापरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत असलेली ओळख सांगून जिवे ठार मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणाऱ्या कुंडलवाल पिता-पुत्रांवर असून एक गुन्हा दाखल झाला आहे. भद्रकाली पोलीस स्टेशन पाठोपाठ गंगापूर, पंचवटी पोलिस ठाण्यांमध्येही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
संशयित रोहित यास भद्रकाली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, त्याचे वडील संशयित कैलास कुंडलवाल व निखिल कुंडलवाल हे अद्याप फरार आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या ज्येष्ठ फिर्यादी कर्जदाराला १९९९ मध्ये पाच लाखांचे कर्ज देत त्याच्याकडून आतापर्यंत ८० लाखांची व्याज वसुली केली. दंडवजा खंडणीच्या रूपात आणखी ५० लाखांची मागणी करत जमिनीची मूळ कागदपत्रे नावावर करून मुलांचे अपहरण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिता-पुत्रांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम, भारतीय हत्यार कायदा, खंडणी वसुली, विनयभंगाचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीचे कुंडलवाल याने त्याच्या सासूच्या नावावर जनरल मुखत्यारपत्र तयार करून घेतले. यानंतर फिर्यादीच्या दोघा मुलांचे अपहरण केले. तसेच, त्यांच्या पत्नीचाही विनयभंग केला. डोक्याचे केस पकडून सोन्याचे दागिने व रोकड हिसकवून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ‘जोपर्यंत आमचे ५० लाख रुपये देत नाही, तोपर्यंत तुमची जमीन परत करणार नाही, तसेच तुमचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू’, असे म्हणत धमकी देऊन मारहाण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२८/२०२४)