नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने धडक कारवाई करत तीन गुन्हे उघडकीस आणले. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीस बेड्या ठोकल्या. तर, दुसऱ्या एका कारवाईत फुलेनगर सार्वजनिक तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले.
याशिवाय मोबाइल लुटणारे देखील जाळ्यात सापडले. पोलिस आयुक्त संदीक कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, पोलिस नाईक विशाल देवरे, अमोल कोष्टी यांनी सुमित दयानंद महाले (२१, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी) यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली.
सुमिता हा अनेक गुन्ह्यातील आरोपी असून तो फरार होता. तर, फुलेनगर येथील हाणामारी, तोडफोडप्रकरणी प्रेम दयानंद महाले (२२), हेमंत ऊर्फ सोनू धोंडीराम मोरे (१८) यांना पेठ फाटा येथे सापळा रचून अटक करण्यात आली. हे दोघेही आरोपी घटना घडली तेव्हापासून फरार होते.
मोबाइल विक्रीस आले अन् सापडले:
दोन अट्टल चोरटे चोरी केलेला महागडा मोबाइल विक्रीसाठी काळ्या रंगाच्या दुचाकीने आले होते. मात्र, ते पोलिसांच्या तावडीत सापडल्याने त्यांचा प्लॅन फसला. नाशिकरोड येथील वीर सावरकर उड्डाणपुलाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. अजय राजेंद्र गरुड (२५, रा. माळेगाव, ता. सिन्नर), विक्रम त्र्यंबक लहाने (२३, सोनगिरी, ता. सिन्नर) यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल व द्याकी ताब्यात घेण्यात आली.