नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुलगी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह करण्यात आला. संशयित पतीलाही ती अल्पवयीन असताना तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आली असता तिच्या जन्मतारखेवरून सदरची बाब निदर्शनास आली.
याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अल्पवयीन गर्भवती मुलीच्या सासर आणि माहेरच्या लोकांविरोधात पोक्सोसह बलात्कार व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यातील अशी ही तिसरी घटना आहे. नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या महिला हवालदार योगिता पुंड यांनी याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार, १७ वर्षे १० महिने वय असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथील अल्पवयीन मुलीचे घनसांगवी (जि. जालना) येथील मुलाशी विवाह २७ सप्टेंबर २०२२ रोजी म्हसरूळ परिसरातील एका कार्यालयात लावून देण्यात आले होते.
संशयित पती राजेंद्र यास मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
अल्पवयीन मुलीला प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यावेळी तिच्या जन्मतारखेची नोंद करण्यात आली. त्यावेळी सदरची बाब उघडकीस आली.
याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सदरची माहिती तालुका पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. पोलीस तपासामध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात सासर व माहेरच्या लोकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कठोर अंमलबजावणीची आवश्यकता:
दरम्यान अल्पवयीन मुलीने गेल्या २५ सप्टेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी. अहिरे हे तपास करीत आहेत. गेल्या काही महिन्यातील अशा स्वरुपाची ही तिसरी घटना आहे.
यामुळे शासनाकडून बालविवाहांना आळा बसल्याचा दावा केला जातो, तो फोल ठरतो आहे. यावरून अदयापही बालविवाह सुरू असून, त्यांना अटकाव घालण्यासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
![]()


