नाशिक: रिकव्हरीसाठी कंपनीत आला अन् परस्पर विकले साडेतीन कोटींचे साहित्य

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रिकव्हरीसाठी कंपनीचा ताबा घेऊन त्यातील इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, मशिनरी व ऑफिसचे फर्निचर असे साडेतीन कोटी रुपयांचे साहित्य परत न करता त्याची परस्पर विक्री करून त्यांचा अपहार केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वीरेंद्र नथू झोपे (वय 54, रा. दातेनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांची अंबड एम. आय. डी. सी., दातीर मळा येथे कंपनी आहे. झोपे यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीच्या विस्तारासाठी अन्य एका फायनान्स कंपनीकडून काही रक्कम घेतली होती; मात्र काही कारणास्तव ही रक्कम फिर्यादी झोपे यांना देणे शक्य झाले नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा मृत्यू

म्हणून फायनान्स कंपनीने दिलेल्या रकमेच्या रिकव्हरीसाठी कंपनीचे प्रतिनिधी संशयित आरोपी धर्मेंद्र मौर्य यांनी कंपनीच्या वतीने फिर्यादी झोपे यांच्या कंपनीचा ताबा घेतला.

त्यावेळी कंपनीतील रोबोटिक्स व ऑटोमेटिक मशिनरीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स व मशिनरी, ऑफिससाठी असलेले फर्निचर व इतर साहित्य असे एकूण 3 कोटी 50 लाख रुपयांचे साहित्य फायनान्स कंपनीच्या वतीने ताब्यात घेण्यात आले होते; मात्र हे साहित्य आरोपी धर्मेंद्र मौर्य याने फिर्यादी झोपे यांना परत न करता परस्पर विक्री करून त्याचा अपहार केला. हा प्रकार दि. 10 जानेवारी ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादी झोपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी धर्मेंद्र मौर्य याच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790