नाशिक (प्रतिनिधी): पोलीस असल्याची बतावणी करत दोघा भामट्यांनी वृद्धाचे दागिने लांबवल्याची घटना अशोका मार्ग भागात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक लक्ष्मण गायकवाड (वय ७५, रा. कल्पतरूनगर, नाशिक) हे दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास अशोका मार्ग येथून घराकडे पायी जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम दोन वेगवेगळ्या मोटारसायकलींवरून गायकवाड यांच्याजवळ आले. “आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत. येथे चोऱ्या खूप होतात. म्हणून साहेबांनी गस्त घालायला सांगितली आहे,” असे म्हणत “तुमच्या अंगावर काय दागिने असतील, ते काढून द्या,” असे म्हटल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व दीड ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तोतया पोलिसांच्या हातात दिली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे रुमाल मागितला. त्या रुमालात सोन्याची अंगठी, साखळी व घड्याळ गुंडाळून तो रुमाल गायकवाड यांच्या हातात दिला. त्यानंतर गायकवाड यांनी घरी आल्यानंतर रुमाल उघडून पाहिला असता त्यात फक्त घड्याळ मिळून आले. तोपर्यंत तोतया पोलिसांनी गायकवाड यांचा ६९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


