नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एकलहरा गेटजवळील सामनगाव येथे अज्ञात इसमांनी विवाहितेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून करत तिच्या भाच्यावरदेखील तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली.
मूळ उत्तर प्रदेशातील सुदाम बनेरिया हा तरुण पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटलशेजारी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत सुदाम हा पत्नी क्रांती (वय २७) व दोन लहान मुलांसह राहतो.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती व त्यांचा भाचा अभिषेक सिंग (वय २२) हे दोघे घरात एकटे होते. यावेळी अज्ञात इसमांनी घरात घुसून क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केला. तसेच अभिषेक याच्यावर वार करून गंभीर जखमी केले.
गळ्यावर वार झाल्याने क्रांती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी अभिषेक आरडाओरडा करत बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळतच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला नेमका कुठल्या कारणामुळे झाला व कोणी केला, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही.
![]()


