नाशिक। दि. ४ जुलै २०२५: सातपूरला परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. पवार संकुल, अशोकनगर) याचे त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांसोबत रोजी बेंचवर बसण्याच्या कारणातून वाद झाले होते. २ जुलैला शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हिरे गार्डन जवळील एका खासगी क्लासेसजवळ त्याचे पुन्हा त्या मुलांसमवेत वाद झाले.
यावेळी दोघांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याला जबर मार लागल्याने यात त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३३/२०२५)