नाशिक (प्रतिनिधी): कुरिअर देण्याचा बहाणा करून एका इसमाच्या हातातील आयफोन हिसकावून त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या दोन बँक खात्यांमध्ये इंटरनेटचा वापर करून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची रक्कम इतर बँक खात्यांमध्ये वर्ग करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून, दोन कुरिअर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे गंगापूर रोड परिसरात राहतात. त्यांची कंपनी आहे. दि. २ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ब्ल्यू डर्ट कुरिअरचे नाव सांगून ३० ते ४० वयोगटातील दोन अनोळखी इसम कुरिअर देण्याचा बहाणा करून त्यांच्या घरी आले.
त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी कुरिअर देण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या हातात असलेला महागडा आयफोन हिसकावून नेला. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या कंपनीच्या नावे असलेल्या दोन बँक खात्यांमध्ये इंटरनेट बँकिंगचा वापर करून एकूण ३ कोटी ५३ लाख ५५ हजार ३५३ रुपयांची रक्कम फिर्यादीच्या कंपनीच्या बँक खात्यातून इतर बँक खात्यांमध्ये वर्ग करून फसवणूक केली.
या प्रकरणी कुरिअरचे दोन कर्मचारी, बँक खाते उपलब्ध करून देणारे खातेधारक व त्यांचे समन्वय करणा-या अनोळखी इसमांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.
1808 Total Views , 66 Views Today