नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील २७ वर्षीय परप्रांतीय महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या २४ तासाच्या करून खुन्याला सातपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गावाकडील जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने चुलत सासऱ्यानेच आपल्या चुलत सुनेचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मूळची मध्य प्रदेश व सध्या सातपुर येथे राहणाऱ्या अशोक्तीबाई शनीदयाल बैग या परप्रांतीय महिलेची सोमवारी सकाळी हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.
विशेष म्हणजे बैग कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी सातपूर गावातील आनंद रघुनाथ नाठे यांचे घरात भाडेकरू म्हणून राहण्यास आले होते. सोमवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक्तीबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या होत्या.
तीनच दिवसांपूर्वी वास्तव्यास आलेल्या या बैग कुटुंबीयांबद्दल जास्त माहिती नसल्याने खुनाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान सातपूर पोलिसांसमोर उभे ठाकले होते.
दरम्यान, पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत काही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी जयकुमार परसराम बैग (वय २६, रा.आनंद रघुनाथ नाठे यांचे घरात भाडेकरू, विधाते गल्ली, मुळ रा. मध्यप्रदेश) याने खुनाची कबुली दिली.
खून करण्यात आलेली महिला संशयित आरोपाची चुलत सून असून गावाकडे त्यांचा जमिनीवरून वाद सुरू होता. गावाकडे भांडण करून नुकतेच बैग कुटुंब सातपूरला आले होते. सोमवारी सकाळी संशयित आरोपी आपल्या चुलत सुनेला जमिनीच्या वादावरून विचारणा करण्यासाठी गेला असता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
भांडण विकोपाला जात रागाच्या भरात चुलत सासर्याने स्वयंपाक घरातील सुरीने चुलत सुनेचा गळा चिरल्याची कबूली दिली.
दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहा पोलीस निरीक्षक धिरज गवारे पो उनि बाळासाहेब वाघ, गुन्हे प्रकटीकरण पथक आदींनी परिश्रम घेत गुन्ह्याची उकल केली असल्याची माहिती पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मयत महिला व संशयित आरोपी एकाच घरात (जुन्या पद्धतीची माडी) खालीवर राहतात. मयत महिलेचा पती कामावर गेल्यावर संशयित आरोपी खालच्या घरात गेला. जमिनीच्या वादावरून सुरू झालेले भांडण विकोपाला गेले. संशयित आरोपीने अवघ्या दहा मिनिटात स्वयंपाक घरातील सुरीने महिलेचा गळा चिरून पुन्हा आपल्या वरच्या घरात जाऊन झोपून घेतले.