नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर शिवारातील फाशी डोंगराजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघा युवकांना मारहाण करून त्यांची लूट करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात गंगापूर पोलिसांना यश आले. संशयित टोळीकडून दोन दुचाक्यांसह चोरीचा मुद्देमाल असा सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयितांपैकी दोघे सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासातून समोर आले आहे. न्यायालयाने संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भूषण त्र्यंबक गोलाईत (१९, रा. खांडेकरनगर, माऊली लॉन्स, सिडको), कृष्णा संतोष दळवी (२०, रा. कोकन भवन, कामटवाडे), निलेश सुनील कुमावत (२१, रा. पवननगर, सिडको), आदिल आसिफ खाटीक (२०, रा. तोरणानगर, पवननगर), यश उर्फ सोनू वसंत रणधीर (१९, रा. कामटवाडा), चंदू गोपाळ आवळे (१९, रा. वनश्री कॉलनी, डीजीपीनगर-२) अशी लुटमार करणार्या संशयितांची नावे आहेत.
यातील दोघे संशयित भूषण व निलेश हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.या संशयितांकडून ८० हजारांची सोन्याची लगड, ४० हजारांची सोन्याची अंगठी, ९० हजारांची दुचाकी (एमएच १५ जेक्यू ११४७), १० हजारांचा मोबाईल, ९० हजारांची दुचाकी (एमएच १५ एचझेड ८७७२), ९० हजारांची दुचाकी ( एमएच १५ जेपी २७१३), १० हजारांचे घड्याळ असा ४ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक निरीक्षक सोमनाथ गेंगजे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, विनायक आव्हाड, मच्छिंद्र वाकचौरे, रमेश गोसावी, सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, विजय नवले, भागवत थविल, गणेश रेहरे, मधुकर सहाणे यांनी बजावली.
असे केले जेरबंद: फिर्यादी कोठावदे व त्यांचा मित्र वैभव हे १५ जून रोजी फाशीच्या डोंगराजवळील रस्त्यालगत त्यांची टियागो कार थांबवून लघुशंका करीत होते. त्यावेळी दुचाक्यांवरून आलेल्या या संशयितांनी त्यांच्या कारची काच फोडून दोघांना मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड हिसकावून पोबारा केला. गंगापूर पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल होता. गुन्हेशोध पथक तांत्रिक विश्लेषणानुसार तपास करीत असताना संशयितांनी फिर्यातीच्या मोबाईलचा वापर करीत फोन-पे ॲपद्वारे आर्थिक व्यवहाराचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी वापरातील मोबाईलवरून संशयित यश रणधीर याची माहिती मिळाली असता पोलिस अंबड, सिडको परिसरात त्याचा शोध घेत होते. त्याची माहिती मिळताच संशयित उल्हासनगर व नंतर मालेगावत दडून बसले. पोलिसांनी माग काढून सिडकोतून संशयित भूषण गोलाईत, कृष्णा दळवी यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून उर्वरित चौघांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सोमनाथ गेंगजे हे करीत आहेत.