
नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलिस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात असलेल्या ‘श्री ज्वेलर्स’ नावाच्या सराफी पेढीमध्ये आठवडाभरापूर्वी भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून जबरी लूट करण्यात आली होती. या लुटीचा मुख्य सूत्रधारअसलेला संशयित नरेंद्र हरीराम अहिरराव (वय २५, रा. जि. करवाडा गाव, म. प्रदेश) यास हरयाणात गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या.
भरदिवसा सोमवारी (दि. १७) दुचाकीस्वार तिघा लुटारूंनी जबरी लूट केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने संशयित नीलेश ऊर्फ शुभम बेलदार (२५, रा. दत्तनगर, चुंचाळे) तसेच शाहरूख गुलाब शेख (२७) या युवकाला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखा गुंडाविरोधी पथकाने मास्टरमाइंडचा शोध घेतला असता त्याचे ‘लोकेशन’ थेट हरयाणात आढळून आले. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गोपनीय माहितीची खात्री पटविली. याबाबत उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती कळविली. त्यांनी त्वरित मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांचे पथक तयार करून हरयाणा गाठले.
पथकाने हरयाणा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या मध्य प्रदेशातील काही लोकांची माहिती काढली. संशयिताबाबत चौकशी केली असता पहाटे चारच्या सुमारास तो शिवपुरी रोड, करनाल येथे असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे दागिने हस्तगत करण्यात आले नाही. त्याने दागिन्यांची काय व कोठे विल्हेवाट लावली? याबाबतच्या तपासाकरिता नरेंद्र यास अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उप निरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790