नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भुसावळ शहराला हादरवून टाकणाऱ्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने मुख्य संशयित आरोपी करण पतरोड याच्या द्वारका भागातून मुसक्या आवळल्या असून त्याच्या कडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
तर दुसरीकडे गुजरातला पळून जात असण्याच्या प्रयत्नात संशयित माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी याला साक्री पोलिसांनी साक्रीतील एका ढाब्यातून अटक केली. तसेच भुसावळ पोलिसांनी संशयित विनोद चावरिया याला भुसावळातून ताब्यात घेतले आहे. अवघ्या २४ तासांच्या आत जळगाव, धुळे आणि नाशिकच्या पोलिसांनी मुख्य संशयितांना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २९ मे २०२४ रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर आरोपीतांनी बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केले म्हणुन दिनांक ३० रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांचे आदेश व सुचनेप्रमाणे पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने भद्रकाली पोलीस ठाणे हद्यीत गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असतांना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे.
त्यावरून गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन द्वारका येथे पथकासह सापळा लावला. संशयीत हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने तो पोलीसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. आरोपी करण किसन पतरोड (वय २० रा. ७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ, जि. जळगाव) याचेकडुन भुसावळ येथे संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्यांची हत्या करतांना वापरलेल्या २ देशी पिस्टल व ५ काडतुसे असे एकुण ८४४२०/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई:
पोलीस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.