
नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२५: सराफ बाजार परिसरात एक लाख रुपयांची खंडणी मागणे, फिर्यादीच्या मुलाला मारहाण करणे तसेच घरावर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयिताला गुन्हे शाखा अंबड पथकाने गंगापूर परिसरातून जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल अशोक तिवारी यांनी १५ मार्च २०२५ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संशयित विराज उर्फ राज जगदीश जंगम याने “सराफ बाजार येथे राहायचे असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील” अशी खंडणीची मागणी केली होती. फिर्यादी यांनी पैसे न दिल्यामुळे आरोपीने त्यांच्या मुलास मारहाण केली. त्याच रात्री पहाटे फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा तसेच त्यांच्या थार कारचे नुकसान केले. शिवाय दोन दिवसांत पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयित आरोपी विराज जंगम पसार झाला होता. तो या दरम्यान राजस्थानातील खाटू श्याम तसेच पुणे येथे वास्तव्य करत असल्याची माहिती तपासात समोर आली.
दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संशयित गंगापूर येथील पाईपलाईन रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार भगवान जाधव व चारूदत्त निकम यांना मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास संशयित विराज उर्फ राज जगदीश जंगम (वय ३०, रा. रूम क्र. ०१, गुरुपुष्यअमृत अपार्टमेंट, बालाजी कोट, दिल्ली दरवाजा, जुने नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले.
तपासात तो सदर खंडणी, मारहाण आणि दगडफेकीच्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम (नेमणूक: अंबड गुन्हे शाखा) यांच्या पथकाने केली.
![]()
